मेमरी मधील फोटो की मोबाईल मधील फोटो ??

गेल्या २-३ दशकातील क्रांती घडवणारी वस्तु म्हणजे मोबाईल फोन. १९७०-८० च्या काळात तर लँडलाईन फोनही मोजक्याच व्यक्तींकडे असत. कॕमेरे पण रोल्सचे असायचे, २४ किंवा ३६  निगेटिव्हजचा रोल लोड करायचे व मगच फोटो निघायचे, तेही पाहायला मात्र निगेटिव्हचा रोल डेव्हलप केल्यावरच. या focus & shoot प्रकारातील याशिका, कोडॕकचे कॕमेरे तेव्हा जास्तीतजास्त वापरल्या जायचे परंतु चांगले फोटो काढणे हे सगळ्यांनाच जमायचे नाही. शिवाय फक्त २४-३६ फोटोच काढू शकल्याने फोटोसुध्दा फारच विचार करुन काढल्या जायचे. त्यामुळे हे कॕमेरे फक्त पिकनिक किंवा मोठ्या कार्यक्रमाच्या वेळीच वापरल्या जायचे अन् ते सुध्दा मोजक्याच व्यक्तींकडे राहायचे. बाकी सर्व प्रसंग हे स्मरणशक्तीने मनात साठवून ठेवल्या जायचे. जुने घरच्या लोकांचे फोटो ब्लॕक-न्- व्हाईट असत व ते सुध्दा स्टुडीओत घेतलेले.

मागील १०-१५ वर्षाँपासून मोबाईल फोनने प्रचंड क्रांती आणली आहे. मोबाईल आता फक्त फोन राहीला नसून स्मार्टफोन झाला आहे. प्रत्येक बाजारात येणाऱ्या नवीन स्मार्टफोन  माॕडेलमध्ये इन-बिल्ट फ्रंट व बॕक कॕमेरा असतोच. या कॕमेरातही नवनवीन सुधारणा होत आहे व आजकाल तर क्वॕड कॕमेरा 108 मेगॕपिक्सेल पर्यँत उपलब्ध आहेत. यामुळे नेहमीचे focus & shoot photo कॕमेरा वेगळा वागवायची गरज संपुष्टात आली. हा स्मार्टफोन कुठेही, कधीही स्वतःचे (सेल्फी) किंवा दुसर्यांचे अनेक फोटो सहज घेऊ शकतात. मेमरी पण चांगली असल्याने त्यावेळी फोटो पाहून ठरवता येते की कुठले फोटो ठेवायचे व कुठले नाही. शिवाय हे फोटो त्याच क्षणाला विविध सोशल मिडियावरुन जगातल्या कानाकोपर्यात सुध्दा इंटरनेट मार्फत शेअर करता येतात. या स्मार्टफोन- वुईथ- कॕमेराने फोटो काढणे व शेअर करणे हे आजकाल एक प्रकारचे व्यसनच झाले आहे. पृथ्वीवरील इतकी प्रचंड लोकसंख्या, त्यात जवळजवळ सर्वांकडेच स्मार्टफोन व रोजच्या फोटोग्राफीमुळे इतके फोटो काढून शेअर केल्या जातात की त्या फोटोंचाही आता अतिरेक होत आहे. सोशल मिडिआवर ह्या शेअर केलेल्या फोटोबद्दल माहिती दिली नसेल तर कुणीही हे फोटो डाऊनलोड करण्याचे कष्टही घेत नाही. खूप जास्त फोटो काढलेत तर फोनची इंटरनल मेमरी फुल होते, स्वतःचाही गोंधळ होतो की कुठले फोटो ठेवायचे आणि कुठले डिलिट करायचे.  थोडक्यात सहज- सुंदर स्मार्टफोन हे उत्कृष्ट साधन असूनही त्यांनी काढलेले फोटो मात्र अक्षरशः वर्तमानपत्रांसारखे झालेत. आज फ्रेश तर उद्या रद्दी !! अजून एक मोठा मुद्दा म्हणजे कॕमेराने फोटो काढताना सर्व लक्ष फोटो काढण्याच्या प्रक्रीयेकडे राहते, मुख्य व्यक्ती वा प्रसंगाकडे बरेचदा लक्ष नसते, त्यामुळे पुढे फोटो पाहतांना स्वतःलाच आपण हा फोटो कशाकरिता काढला हेच स्मरत नाही.

आता आपण मेमरीतील फोटोकडे वळूया. मेमरीतील फोटो म्हणजे, मनावर कोरल्या गेलेले प्रसंग किंवा व्यक्ती. मनाच्या कप्प्यात हे फोटो साठवून ठेवल्या जातात. मानवी मेंदूला सारासार विचार करण्याची शक्ती असल्याने फक्त प्रिय व्यक्तींचे वाईट प्रसंग सोडले तर मेमरीतील वाईट, नको असलेले फोटो आपोआप  डिलिट होतात, अन् राहतात ते फक्त आनंद शेअर करणारे सुंदर, गमतीदार प्रसंगाचे व व्यक्तींच्या आठवणींचे फोटो ! या मेमरीतील फोटोंना मात्र लागते उत्तम निरिक्षण व स्मरणशक्ती.

योग्य मैफिलीत मग आपल्या विशिष्ट शैलीने हे मेमरीत साठवून ठेवलेले फोटो जिवंत करुन सादर करण्याची कला काही जणांना अवगत असते व ते मग तैलचित्रांच्या माध्यमातून, काही कोरिव शिल्पातून, काही लेख- कवितेच्या मार्फत सादर केल्या जाते. वीर पुरुष – वीरांगनाचे शौर्य हे पोवाडा, जोषपूर्ण गीतांच्या मार्फत लोकांकडे पोहोचवल्या जाते.पूर्वी या मेमरीतील फोटोमार्फत पिढीला बोधप्रद गोष्टी, संस्कारपूर्ण कथा,परंपरा सागायचे. काही याला दंतकथा ही म्हणायचे.

सुट्यांमध्ये, गेट- टू- गेदरमध्ये किंवा जेव्हा गप्पांचे फड जमतात त्यावेळी आपल्या मेमरीतून रिवाईंड करुन मेमरीतील फोटो काढून त्याचे जिवंत सादरीकरण करुन जो ठसा आपल्या मनात राहतो त्याची सर आजचे १०८ MP स्मार्टफोन-कॕमेराला नाही.गंमत म्हणजे हे मेमरीतील फोटोंचे सादरीकरण जेव्हा सुरु असते, तेव्हा मैफिलीतील ऐकणारा जर त्या प्रसंगाचा अजून कुणी त्या प्रसंगाचा साक्षीदार असेल, अन् मध्येच सादरीकरण करणारा एखादा बारिक ही पाॕईंट विसरला तर हा दुसरा मध्येच तो पाॕईंट सांगून टेकओव्हर करु शकतो. सादरीकरण करणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून मीठ-मसाला लावून ते मेमरीतील फोटो किती मसालेदार, खुमासदार, विनोदी होईल हे मैफिलच्या मूड नी ठरवत असतो.एखादा छोटासा मजेदार प्रसंगही इतक्या वेळ व दाद घेत घेत हळूहळू सरकतो की कसा वेळ गेला तेच कळत नाही,  अन् हेच वैशिष्ट्य आहे मेमरीतील फोटोंचे.  मात्र हे सगळं सांगणाऱ्याच्या कौशल्यावरच अवलंबून असते. ही शैली असणारे व्यक्तीचे जेव्हा मैफिलीत आगमन होते व त्यांना मग आपले मेमरीतील फोटो उलगडून काढून सादरीकरणाची आग्रही गळ घातली जाते. हा आग्रह माझ्या मते त्या मैफिलीचा- गप्पांच्या फडाचा सर्वोत्कृष्ट मान असतो. काॕलेज, होस्टेललाईफचे किस्से, दुसर्यांचे प्रेमप्रकरण,  शिक्षकांनी पकडलेल्या परिक्षेतील चुका व त्याबद्दल केलेली शिक्षा, लहानपणचे फोटो, शाळेतील अनेक गमतीदार प्रसंग हे फक्त मेमरीतील फोटोबद्दल ऐकूनच मनाला स्वर्गीय व अविट आनंद देतात याबद्दल दुमत नाही. परतपरत हे किस्से ऐकायला ही कंटाळा येत नाही.

तर मित्रहो स्मार्टफोन-कॕमेरा वापरा, खूप फोटो काढा, शेअर करा, परंतु मेमरीतील फोटो मात्र जिवंत ठेवा. अन् मग हे मेमरीतील फोटो आठवून जिवंत सादरीकरण करायला मात्र  विसरु नका. हाच तर गेट-टू-गेदर, एकमेकांचा सहवास घडवणारा, एकमेकांना भेटायची एक ओढ लावणारा मुख्य दुवा असतो..

Keep taking photographs but don’t let the memory photographs die !! Enjoy life..