Waterhole Census

जंगलातील अविस्मरणीय रात्र

Dr. Ashutosh Chaoji
– डॉ. आशुतोष चावजी
Anaesthesiologist, Nagpur

महाराष्ट्रातील सर्व राखीव जंगलामध्ये दरवर्षी मे महिन्यात बुध्द पौर्णिमेच्या दिवशी वाघ व अन्य प्राण्यांची गणना [Waterhole Census] केली जाते. या गणनेसाठी वनविभागा तर्फे नागरीकांना संधी दिली जाते. यात जंगलातील पाणवठयांच्या जवळ असलेल्या झाडावर मचाणे बांधली जातात व त्या मचाणावर 24 तास बसून पाणवठयावर कोण-कोणती जनावरे किती संख्येने आली यांची नोंद करावी लागते. एका मचाणावर एक किंवा दोन व्यक्ती व एक वनरक्षक असे बसवले जातात. काही ठिकाणी मोठी कायमस्वरूपी लोखंडी मचाणे असतात, तिथे एकावेळी 3-4 जण बसू शकतात, स्त्रियांना शक्यतो अशी मचाणे दिली जातात.

काही वर्षांपूर्वी आम्ही अशाच एका बुध्दपौर्णिमेला ताडोबाच्या जंगलातील कोळसा विभागातील ‘ताडाची वाही’ नावाच्या पाणवठया जवळच्या मचाणावर सेन्सस साठी गेलो होतो. आम्ही दोघे पतीपत्नी व माझी बहीण व मेहुणे असे चैघेजण एका लोखंडी मचाणावर बसलो होतो. वनरक्षक आमच्या बरोबर न बसता जवळच्याच दुसऱ्या मचाणावर होता. सकाळी 9-10 वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या गाडीने आम्हाला मचाणावर पोचवले होते व आता दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता गाडी आम्हाला परत न्यायला येणार होती. आम्ही चैघेजण दाटीवाटीने त्या छोटया मचाणावर बसलो होतो. मचाणावर बसतांना काही सूचनांचे पालन करावे लागते, ज्या वनविभागाच्या अधिकाऱ्यां कडून मचाणावर जाण्यापूर्वी दिल्या जातात. – उदाहरणार्थ, मोठयाने बोलायचे नाही, चमकतील असे भडक रंगाचे कपडे घालायचे नाहीत, जंगलाच्या वातावरणात मिसळून जातील असे हिरवट, खाकी रंगाचे कपडे घालायचे, वास येईल अशी प्रसाधने वापरायची नाहीत, 24 तास पुरेल एवढे पाणी व साधे खाद्यपदार्थ जवळ ठेवायचे व नैसर्गिक विधीशिवाय इतर कुठल्याच कारणाने मचाणा खाली उतरायचे नाही. सिगरेट, मद्यपान इ. काही करायचे नाही हे सर्व नियम पाळणे फार अत्यावष्यक असते.

आम्हाला मचाणावर बसल्या-बसल्या पाणवठयाच्या आसपास अनेक पक्षी दिसले – खंडया, हळद्या, सुतार, बुळबुळ, सातभाई, कोतवाल, स्वर्गीय नर्तक, टिटवी, हरियाल इ. अनेक पक्षी पाणी प्यायला पाणवठयाच्या आसपास वावरत असतात. आमच्या जवळच्या कॅमेराने आम्ही त्यांचे फोटो काढले. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हाचा जसा आम्हाला त्रास होत होता तसाच तो जंगलातील प्राण्यांनाही होतो.

त्यामुळे तहानेने व्याकुळ होऊन पाणवठयावर पाणी प्यायला ते येतात अशातेळी अगदी निश्चल बसून आपले अस्तित्व त्यांना जाणवू न देणे फार आवश्यक असते.

दुपारी 4 नंतर थोडे ऊन कमी झाल्यावर प्राणी क्रमाक्रमाने, पाणवठयावर येऊ लागले आधी रानडुकरांचा एक कळप येऊन पाणी पिऊन व थोडावेळ चिखलात लोळून गेला त्यांनतर चितळ (ठिपकेवाली हरीणे), सांबर, नीलगाय हे प्राणी 2-2, 4-4 च्या संख्येने येऊन पाणी पिऊन गेले. प्रत्येक प्राणी पाण्याकडे येतांना अतिशय सावधागिरी बाळगत, दबकत दबकत आजूबाजूची चाहूल घेत येतात कारण वाघ, बिबटया इ. शिकारी प्राण्यांची भीती सगळयांनाच वाटत असते.

काही वेळाने एक खूप मोठा रानगव्यांचा कळप नर, मादा, पिल्ले मिळून 30-40 जणांचा पाणवठयावर आला. जवळपास अर्धापाऊन तास त्यांचे जलपान चालू होते. अजस्त्र आकाराचे ते गवे तिथून जाईपर्यंत आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो. त्यांनतर काही वेळाने माकडांचा (लंगूर) मोठा कळप आला. त्यांनी क्रमाक्रमाने पाणी पिले, म्हणजे समोरची माकडे पाणी पित असतांना बाकीचे चैफेर लक्ष ठेवून होते, मग ती समोरची मागे गेली व मागची पुढे आली.

जंगलातल्या प्रत्येक प्राण्याचे अस्तित्व, तो किती सावधगिरीने वागतो यावर अवलंबून असते, कारण आपल्यापेक्षा बलवान प्राणी कुठून झडप घालेल याची काहीच शाश्वती नसते. उन्हाळयाच्या दिवसात पाणवठा हे वाघाचे आवडते स्थान असते, वाघाला उष्णता सहन होत नाही कारण त्यांचे मूळ सैबेरिया सारख्या थंड प्रदेशातील आहे. त्यामुळे पाणी प्यायला येणारे इतर प्राणी आजूबाजूला वाघ नाही ना याबाबतीत जास्तच सावध असतात.

हे सर्व प्राणी पक्षी पाहातांना व त्यांची कागदावर नोंद करतांना हळूहळू संध्याकाळ झाली, उन्हाचा तडाखा थोडा कमी झाला. जसजसा अंधार होऊ लागला तसतशी आम्हालाही थोडी भीती वाटू लागली आम्ही 1-2 दा अगदी सावधगिरीने मचाणाखाली नैसर्गिक विधीसाठी उतरून आलो होतो पण आता अंधार पडल्यावर खाली उतरायची हिम्मत होत नव्हती. थोडेसे खाऊन घेऊ व आळीपाळीने दोघे जण झोपू असे ठरवून आम्ही डबे उघडले तेवढयात आम्हाला मचाणाच्या अगदी जवळून “आउ” अशी वाघाची डरकाळी ऐकू आली आणि आमचे हात जागच्या जागीच थबकले! बापरे, जवळपास वाघ आहे हे जाणवून छाती धडधडायलाच लागली! खाणे राहिले बाजूला, आम्ही डोळे फाडून त्या अंधारात वाघ कुठे दिसतो ते पाहू लागलो. खरं तर अंधार नव्हताचा, बुध्दपौर्णिमेचा पूर्ण चंद्र आकाशात वर आला होता, सुर्दवाने ढग नव्हते, त्यामुळे लखलख चांदण्यात समोरचा बराचसा भाग स्पश्ट दिसत होता आमच्या मचाणासमोर थोडी मोकळी मैदानासारखी जागा होती आणि त्याच्यापलिकडे झाडांची रांग सुरू होत होती. आम्हाला डरकाळी एकू आल्यांनतर 10 मिनिटातच आम्हाला व्याघ्रदर्शन धडले! मैदानाच्या पलिकडून झाडांच्या रांगेला समानंतर असा एक मोठा वाघ अतिशय रूबाबदार पावले टाकत, एखाद्या सम्राटाच्या ऐटीत चालतांना आम्हाला दिसला! शुभ्र चंद्रप्रकाशात अगदी नैसर्गिक स्वरूपात झालेले ते वाघाचे दर्षन आम्ही जन्मात विसरू शकणार नाही सुमारे 5 ते 7 मिनिटे आम्ही त्याच्याकडे डोळे भरून पाहिले, चंद्रप्रकाशामुळे दुर्बिणीतूनही आम्हाला तो व्यवस्थित दिसला फक्त फोटो मात्र काढता आला नाही.

समोरच्या झााडीमध्ये वाघ निघून गेला तरी आम्ही बराचवेळ तसेच न हलता बसून राहिलो. इतक्या जवळून इतके देखणे जनावर जंगलचा राजा – आपल्याला दिसले यावर विश्वासच बसत नव्हता! कितीवेळ झोपही आली नाही. रात्री जंगलात निरव शांतता असेल असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात रात्री अनेक आवाज जंगलात ऐकू येत असतात रातकीडे किर्रर्र करत असतात, रातवा पक्षी (नाईटजार) चकू चकू ओरडत असतो, मध्येच मोराचे, टिटवीचे ओरडणे ऐकू येते, कुठे हरिणाचे ऐकमेकाच्य षिंगावर षिंगे घासण्याचे व मादीला साद घालणारे (रटिंग) आवाज ऐकू येतात, कुठे गव्यांच्या पायांचे पाचोळयांवर वाजणारे आवाज येतात, आणि हो, नशिबात असेल तर वाघाचे खर्जातली डरकाळीही ऐकू येते! खरंच जंगलात मचाणावर रात्र घालवणे हा एक धाडसी आणि रोमहर्षक, चित्तथरारक अनुभव असतो! आम्ही आत्तापर्यंत 4-5 वेळा हा अनुभव घेतला आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी 8 ला आम्ही खाली उतरलो. वनरक्षकाच्या सोबत थोडे पायी चालून गाडीच्या मार्गापर्यंत आलो. वाटेत आम्हाला कालच्या वाघाचे पायांचे ठसे (पगमार्कस्) व निष्ठा दिसली.

गाडीत बसून वनविभागाच्या गेस्टहाऊसमध्ये परत आलो, आमचा प्राणीगणनेचा कागद त्यांना दिला, वाघ दिसल्याबद्दल त्यांनीही आमचे अभिनंदन केले. जेवून आम्ही नागपूरला परतीच्या मार्गाला लागलो.

अशी ही आमची अविस्मरणीय प्राणिगणनेची जंगलातील रात्र आमच्या कायम लक्षात राहिली आहे!